Pune 10/3/25
मुंबईकरांसाठी बजेटमधील महत्त्वाच्या घोषणा

1. 7 आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्रे – मुंबई होणार जागतिक आर्थिक केंद्र
मुंबईमध्ये सात आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. नवी मुंबई, वडाळा, खारघर, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, विरार आणि बोईसर येथे ही केंद्रे उभारली जाणार आहेत.
बीकेसीच्या धर्तीवर विकसित होणाऱ्या या व्यापार केंद्रांमुळे मुंबईचे आर्थिक महत्त्व आणखी वाढणार आहे.
या प्रकल्पामुळे मुंबईची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 14 बिलियन डॉलरवरून 300 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. यासोबतच, 250 एकरांवर “इनोव्हेशन सिटी” उभारण्याची योजना आहे.
रतन टाटा राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने 10,000 महिलांना कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
2. मुंबईचे तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ :
पालघर जिल्ह्यात वाढवण येथे मुंबईचे तिसरे विमानतळ उभारले जाणार आहे. हे विमानतळ मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या स्थानकाशी जोडले जाणार आहे. या नव्या विमानतळामुळे मुंबईतील वाढत्या हवाई वाहतुकीचा भार कमी होईल.
3. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ₹64,000 कोटींचा प्रकल्प :
मुंबई आणि उपनगरांतील वाहतूक सुधारण्यासाठी 64,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यात खालील प्रकल्पांचा समावेश आहे
– वर्सोवा ते मढ खाडी पूल
– वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग
– मुलुंड ते गोरेगाव द्रुतगती मार्ग
– ठाणे ते बोरिवली द्रुतगती मार्ग
– ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्ग
4. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नवीन सुधारणा :
खोपोली ते खंडाळा घाटातील “मिसिंग लिंक” प्रकल्प ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण होईल. यामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
5. ठाणे आणि नवी मुंबईसाठी उन्नत मार्ग आणि कनेक्टिव्हिटी सुधारणा :
ठाणे, डोंबिवली, कल्याण या शहरांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्यासाठी उन्नत मार्ग विकसित केला जाणार आहे. यामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरे अधिक गतिमान होतील.
6. वाढवण बंदर – भारतातील सर्वात मोठे बंदर :
वाढवण बंदर 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे जेएनपीटीच्या तिप्पट असेल आणि जगातील टॉप 10 बंदरांमध्ये समाविष्ट होईल. 300 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक मालवाहतुकीची क्षमता असेल.
अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी “मुंबईचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे” असे स्पष्ट केले. मुंबईच्या पायाभूत सुविधा, वाहतूक आणि व्यापार केंद्रांच्या उभारणीसाठी हे बजेट निर्णायक ठरणार आहे.





Users Today : 10
Users Yesterday : 3